नंदुरबार LCB ची कारवाई ४८ तासांत घरफोडीचा पर्दाफाश; २०लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी जेरबंद….
नंदुरबार || दि. ७ नोव्हेंबर २०२६ || (फिरोज खान) :- नंदुरबार शहरात बंद घराचे कुलूप तोडून लाखोंचे सोने-चांदीचे दागिने आणि रोकड चोरणाऱ्या चोरट्यांचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ४८ तासांत पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल २० लाख ५८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दिनांक ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी चार ते साडेसहा वाजेच्या दरम्यान नंदुरबार शहरातील गणेश नगर परिसरात राहणाऱ्या श्रीमती पुष्पा विनोदकुमार चिंतलागे यांच्या प्लॉट क्रमांक १०, अग्रवाल पेट्रोलपंपाजवळील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला होता. घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १५ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८९८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (अ) आणि ३३१ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. लालबाग कॉलनी परिसरात झालेली घरफोडी ही होळ तर्फे हवेली, शिवरात राहणारा आकाश सोनार आणि त्याचा साथीदार रोहित मोरे यांनी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून नंदुरबार शहरातील जगतापवाडी चौफुली येथे नाकाबंदी केली. रात्री सुमारे ३ वाजून ५ मिनिटांनी संशयित चारचाकी होंडा सिटी कार क्रमांक GJ05JB7788 पोलिसांना दिसली. पोलिसांनी वाहन थांबवून त्यातील दोघांची चौकशी केली.
यावेळी आकाश भिका सोनार (वय २७, रा. ओम साई पार्क, होळ तर्फे हवेली, नंदुरबार) आणि रोहित किशोर मोरे (वय २१, रा. वाठोडा, ता. शिरपूर, जि. धुळे, सध्या रा. शांतीनगर, लिंबायत, सुरत, गुजरात) अशी त्यांची नावे निष्पन्न झाली. पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता, कारच्या डिक्कीतील ग्लोव्ह बॉक्समध्ये असलेल्या लाल रंगाच्या पिशवीत १४ लाख ४८ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आढळून आले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, नंदुरबार शहरातील लालबाग कॉलनी परिसरात बंद घराचे कुलूप तोडून दागिने आणि रोकड चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती प्रेसनोटमध्ये देण्यात आली आहे.
या कारवाईत १४ लाख ४८ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, १० हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली ६ लाख रुपये किमतीची होंडा सिटी कार असा एकूण २० लाख ५८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप आणि अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक महेश निकम, विकास गुंजाळ तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
अवघ्या काही तासांत गुन्ह्याचा छडा लावत दोन आरोपींना जेरबंद करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करणाऱ्या नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.

