महाराष्ट्र व गुजरातचे महामार्ग रक्ताळले! बारडोलीजवळ धुळे व जामनेर एसटी बसची समोरासमोर भीषण धडक; दोन्ही चालकांसह ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू, ३८ गंभीर
बारडोली/ धुळे || दि.०२ जुन २०२६ || {वाहिद काकर}-: गुजरातमधील सुरत जवळील बारडोली-उवा महामार्गावर आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण अपघात घडला. धुळे आगार आणि जामनेर आगाराच्या दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक झाली.
या धडकेनंतर बसने पेट घेतल्याने दोन्ही बस चालकांसह ७ प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला, तर ३८ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे आगाराची सुरत-धुळे बस (MH-18 BZ-1258) बारडोली महामार्गावरून जात असताना, पुढे पलटी झालेल्या एका टँकरला वाचवण्याच्या प्रयत्नात चालक व्ही. एम. पाटील यांचा ताबा सुटला. भरधाव बस दुभाजक तोडून विरुद्ध बाजूच्या मार्गावर गेली.

याच वेळी समोरून येणाऱ्या जामनेर आगाराच्या जामनेर-सुरत बसला (MH-20 BL-3390) तिची जोरदार धडक बसली. ही बस सीएनजीवर असल्याने धडकेनंतर काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण केले आणि प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.

या भीषण दुर्घटनेत धुळे आगाराचे चालक व्ही. एम. पाटील आणि जामनेर आगाराचे चालक घनश्याम राघो बरकले यांच्यासह एकूण ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. वाहक एच. एच. पवार आणि सोपान क्षीरसागर यांच्यासह ३८ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
स्थानिक नागरिक आणि बारडोली अग्निशमन दलाने युद्धपातळीवर बचावकार्य करून आग आटोक्यात आणली. जखमी प्रवाशांना बारडोली सिव्हिल हॉस्पिटल (१९), सुरत सिव्हिल हॉस्पिटल (५), सरदार हॉस्पिटल (८) आणि ओम साई हॉस्पिटल (६) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र व गुजरातमध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
