धरणगाव रेल्वे स्थानकावर अमरावती सुपरफास्ट एक्स्प्रेसमधून पडून अमळनेरच्या २४ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू…
धरणगाव /जळगाव || दि. १३ अगस्त २०२६ || ( विठ्ठल भालेराव)-: धरणगाव रेल्वे स्थानकावर अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेसमधून पडून गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे ४.४० वाजता घडली.
मृत युवकाचे नाव सुभान शाह शकील शाह असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुभान शाह हे अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेसमधून प्रवास करत असताना धरणगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून खाली पडले. या दुर्घटनेत ते गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर त्यांना तातडीने धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना जळगाव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात येत होते. मात्र, जळगावकडे नेत असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
सुभान शाह यांच्या पश्चात पत्नी, अवघ्या चार महिन्यांचा मुलगा, आई-वडील व भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेचा पुढील तपास धरणगाव जीआरपीएफचे हिरा चौधरी करीत आहेत.
