जन्म-मृत्यू दाखल्यासाठी कर पावतीची अट तात्काळ रद्द करा; माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांचे आयुक्त, महापौरांसह मुख्यमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन
जळगाव || दि. १४ ऑगस्ट २०२६ || (विठ्ठल भालेराव)-: जन्म-मृत्यू दाखला मिळविण्यासाठी महानगरपालिकेचा मालमत्ता कर भरल्याची पावती सादर करणे अनिवार्य करण्यात आल्याचा आरोप करत ही जाचक व अन्यायकारक अट तात्काळ रद्द करावी, अशी मागणी जळगाव शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महानगरपालिका आयुक्त, महापौर, मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त, जळगाव शहराचे आमदार, खासदार स्मिता वाघ आणि जिल्हाधिकारी यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठविले आहे.
जन्म दाखला हा नागरिकाच्या जन्माची अधिकृत नोंद करणारा अत्यावश्यक दस्तऐवज आहे. त्याचा मालमत्ता कर भरण्याशी कोणताही संबंध नसताना कराची पावती सादर करण्याची अट घालणे योग्य नाही, असे सोनवणे यांनी निवेदनात म्हटले आहे. एखादे कुटुंब भाड्याच्या घरात राहत असेल, मालमत्ता दुसऱ्याच्या नावावर असेल किंवा कराबाबत काही वाद असेल, तर त्याचा परिणाम नवजात बालकाच्या जन्मदाखल्यावर होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.
जन्मदाखला उपलब्ध न झाल्यास शाळा प्रवेश, शासकीय योजना, पासपोर्ट, शैक्षणिक कागदपत्रे तसेच इतर प्रशासकीय कामांमध्ये नागरिकांना अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कर वसुलीसाठी जन्म-मृत्यू दाखल्यासारख्या अत्यावश्यक नागरी कागदपत्रांचा वापर करू नये. कर थकबाकी असल्यास त्यासाठी स्वतंत्र कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी सोनवणे यांनी केली आहे.
मूलभूत सुविधांबाबतही प्रशासनाला सवाल..
‘आधी नागरिकांना मूलभूत सुविधा द्या, मग कराची भाषा करा,’ असे म्हणत सोनवणे यांनी शहरातील विविध नागरी समस्यांकडेही प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. अनेक भागांतील तुंबलेल्या गटारी, अपुरी स्वच्छता, खराब रस्ते व खड्डे, पथदिव्यांची समस्या, मोकळ्या भूखंडांचा सार्वजनिक वापर, उद्याने, जॉगिंग ट्रॅक, खेळाची मैदाने, वाचनालये, व्यायामशाळा आणि नागरिक सुविधा केंद्रांबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
महानगरपालिका संकुल तसेच खासगी कॉम्प्लेक्समधील पार्किंगची समस्या, रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि अनधिकृत पार्किंगमुळे निर्माण होणारा अपघाताचा धोका यावरही प्रभावी कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मेहरूण तलावातील प्रदूषणाचा मुद्दाही उपस्थित..
जळगाव शहरातील महत्त्वाचा जलस्रोत असलेल्या मेहरूण तलावात गटारीचे पाणी सोडले जात असल्याच्या तक्रारी अनेक वर्षांपासून करण्यात येत असल्याचे सोनवणे यांनी निवेदनात नमूद केले आहे. जलस्रोताचे प्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिकेने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
महानगरपालिकेने नागरिकांकडून कर वसुली करण्यापूर्वी मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पार पाडावी. जन्म-मृत्यू दाखला हा कर वसुलीचे साधन बनवू नये, अशी ठाम भूमिका सोनवणे यांनी व्यक्त केली.
जन्म-मृत्यू दाखला देण्यासाठी मालमत्ता कर भरल्याची पावती अनिवार्य करण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा आणि शहरातील विविध नागरी प्रश्नांवर कालबद्ध कृती आराखडा जाहीर करावा, अन्यथा नागरिकांच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन तसेच उपलब्ध कायदेशीर व प्रशासकीय मार्गांचा अवलंब करण्यात येईल, असा इशाराही सोनवणे यांनी निवेदनातून दिला आहे.
