यावलमध्ये सहा वर्षीय मुलाचा मृतदेह संशयास्पदरित्या सापडल्याने खळबळ…
जळगाव || ७ सप्टेंबर २०२५ || (विठ्ठल भालेराव)-: जळगाव जिल्ह्यातील यावल शहरातील बाबुजीपुरा परिसरात बेपत्ता झालेल्या सहा वर्षीय मुलाचा मृतदेह शेजाऱ्यांच्या घरात सापडल्याने शनिवारी शहरात खळबळ उडाली. संतप्त नागरिकांनी संशयिताच्या दुकानावर दगडफेक केली असून परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
घटना कशी घडली_ शुक्रवारी (६ सप्टेंबर) सायंकाळी सुमारे सहा वाजता मोहमंद हन्नान खान मजीद खान (वय ६) हा मुलगा अचानक बेपत्ता झाला. कुटुंबीय व नातेवाईकांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला, परंतु त्याचा मागोवा लागला नाही. शनिवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू केली असता, शेजारी राहणारे बिस्मिल्ला खलिफा यांच्या दुमजली घराच्या वरच्या मजल्यावरील कोठीत सकाळी ११ वाजता मुलाचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळला.
संताप व तणाव_ धक्कादायक बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले. संतप्त जमावाने मुख्य रस्त्यावरील बारी चौकाजवळील संशयिताच्या दुकानावर दगडफेक केली. खबरदारीचा उपाय म्हणून व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली.
पोलिसांची धावपळ_ गणेश विसर्जनाच्या दिवशीच तणाव वाढू नये म्हणून पोलिसांनी तातडीने दंगा नियंत्रण पथकाला पाचारण केले. हाजी शब्बीर खान, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे, सहायक पोलीस निरीक्षक अजय वाढवे, उपनिरीक्षक अनिल महाजन, एम.जे. शेख, अयाज खान आदी अधिकारी व मुस्लिम समाजातील मान्यवरांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले. न्यायवैद्यक पथकानेही घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
सद्यस्थितीही_ परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बाबुजीपुरा परिसरासह शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेमुळे यावल शहरात शोककळा पसरली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
