एलसीबीचा शिरपूरात मध्यरात्री धडक छापा; दीड लाखांची विदेशी दारू जप्त, बुटलेगर फरार…

एलसीबीचा शिरपूरात मध्यरात्री धडक छापा; दीड लाखांची विदेशी दारू जप्त, बुटलेगर फरार…

धुळे || दि.०२ जून २०२६ || {वाहिद काकर} -: शिरपूर तालुक्यातील दहिवद शिवारात सुरू असलेल्या अवैध विदेशी दारूच्या साठ्यावर स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मध्यरात्री धडक कारवाई करत सुमारे दीड लाख रुपयांची विदेशी दारू जप्त केली. या कारवाईदरम्यान संशयित बुटलेगर अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, दहिवद शिवारातील एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना विदेशी दारूचा मोठा साठा ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या पथकाने मध्यरात्री छापा टाकला.

या कारवाईत ‘इम्पिरियल ब्लू’ व ‘रॉयल स्टॅग’ कंपनीच्या विदेशी दारूचे एकूण १४ बॉक्स, म्हणजेच ६७२ बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या दारूची अंदाजे किंमत १ लाख ५३ हजार ६०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, या अवैध दारू साठ्याचा संशयित मालक रमेश जाटीराम पवारा हा पोलिसांची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला. त्याच्याविरोधात शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार प्रशांत चौधरी, चेतन बोरसे, राहुल गिरी, कमलेश सूर्यवंशी, विनायक खैरनार आणि हर्षल चौधरी यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Call Us