जुम्मा नमाजनंतर चिराग अली मस्जिदमध्ये पावसासाठी सामूहिक दुआ…
नंदुरबार, दि. १७ जुलै २०२६ (फिरोज खान)-: नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिक चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जुम्माची नमाज अदा केल्यानंतर शहरातील चिराग अली मस्जिदमध्ये पावसासाठी विशेष सामूहिक दुआ करण्यात आली.
नमाजनंतर मस्जिदचे इमाम मौलाना हाफिज सलमान यांनी अल्लाहकडे पावसासाठी मनोभावे दुआ केली. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून अपेक्षित पाऊस झालेला नसल्यामुळे शेती कोरडी पडली असून पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनत आहे. अशा कठीण परिस्थितीत प्रत्येकाने नम्रतेने अल्लाहकडे दया आणि रहमतची याचना करावी. पाऊस देणारा आणि प्रत्येक अडचणीतून मार्ग काढणारा अल्लाहच आहे.
या सामूहिक दुआमध्ये चिराग अली मस्जिदमध्ये शेकडो नमाजी उपस्थित होते. सर्वांनी हात वर करून अत्यंत श्रद्धा आणि भावनेने अल्लाहकडे पावसासाठी प्रार्थना केली.
दुआदरम्यान शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण, पशुधनाचे कल्याण, जिल्ह्यावर भरपूर आणि लाभदायक पाऊस पडावा तसेच पाण्याच्या टंचाईतून नागरिकांची लवकर सुटका व्हावी, यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.
यावेळी मौलाना हाफिज सलमान यांनी सांगितले की, माणूस म्हणून आपण आवश्यक ते सर्व प्रयत्न करतो; मात्र निसर्गाचा कारभार अल्लाहच्या इच्छेनुसार चालतो. त्यामुळे प्रत्येक नमाजमध्ये आणि प्रत्येक दुआमध्ये पावसासाठी अल्लाहकडे प्रार्थना करावी. तसेच उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, पाण्याची नासाडी टाळावी आणि गरजू लोकांना शक्य ती मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
