फ्लिपकार्ड कंपनीमधून येणाऱ्या ऑनलाईन वस्तूंची फसवणूक करणारे तीन आरोपी मुद्देमालासह अटक
नंदुरबार दि. १७ जुलै २०२६ ( फिरोज खान ) :- नंदुरबार शहर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकानी फ्लिपकार्ट कंपनीमधुन येणाऱ्या ऑनलाईन वस्तुंची फसवणुक मधील गुन्हयातील तिन आरोपीकडून १० led टी. व्ही, एक पॅनासोनिक कंपनीची ए.सी.गिझर, मॉपसेट, होम थिएटर हस्तगत करण्यात यश.
नागरिकांनो सावधान! स्वस्तात वस्तू मिळत असल्याच्या मोहाला बळी पडू नका, वस्तू चोरीची अथवा फसवणुकीची नाही ना. याची खात्री करा. दि. १३/०७/२०२६ रोजी नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथील पो.कॉ. आनंदा मराठे व राकेश मोरे, उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, नंदुरबार विभाग यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की. नंदुरबार शहरात ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्या नागरिकांच्या ऑर्डरमध्ये काही डिलिव्हरी बॉय ग्राहकांनी मागविलेल्या नवीन वस्तूंच्या ऐवजी त्याच प्रकारच्या जुन्या अथवा इतर वस्तू पार्सलमध्ये ठेवून ग्राहकांची फसवणूक करीत आहेत.
सदर माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख तसेच पोलीस अंमलदार आनंदा मराठे, रुपेश पगारे, पोलीस हवालदार जगदीश पाटील, राहुल राठोड, अनिल वसावे व निंबाबाई वाघमोडे यांना सूचना दिल्या. पथकाने माहितीची पडताळणी केली असता ती प्रथमदर्शनी खरी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर संशयितांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान मिळालेल्या माहिती व उपलब्ध पुराव्यांच्या आधारे सदर प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणाबाबत फ्लिपकार्ट कंपनीचे नंदुरबार येथील व्यवस्थापक आरिफ हुसेन यांच्याशी संपर्क साधला असता, अशा प्रकारच्या ग्राहकांच्या तक्रारी यापूर्वीही प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संबंधित वस्तूंची रक्कम त्यांच्या वेतनातून वसूल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
फिर्यादीत त्यांनी नमूद केले आहे की, फ्लिपकार्टवर ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांनी मागविलेल्या वस्तूंच्या ऐवजी मूळ वस्तू पार्सलमधून काढून त्याठिकाणी त्याच स्वरूपाची जुनी अथवा इतर वस्तू ठेवण्यात येत होती.
त्यामुळे ग्राहकांना चुकीच्या वस्तू प्राप्त होत असल्याने त्या कंपनीकडे परत (रिटर्न) पाठविल्या जात होत्या. या प्रकारामुळे ग्राहकांची तसेच फ्लिपकार्ट कंपनीची आर्थिक फसवणूक व नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी आरिफ हुसेन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पर्वेज मोहम्मद, सुफियान रज्जाक मणियार व राज विनोद मराठे (सर्व रा. नंदुरबार) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१६ (४) व ३(५) अन्वये नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपींनी विक्री केलेल्या वस्तूंचा शोध घेऊन आतापर्यंत सुमारे ६,००,०००/-लाख रुपये किमतीचा मुद्देमाल नंदुरबार जिल्ह्यातील विविध नागरिकांकडून जप्त करण्यात आला त्यात १० led टी.व्ही. पॅनासोनीक कंपनीचा एसी, एक गिझर एक मॉप सेट तसेच स्मार्ट होम थिएटर यांचा समावेश आहे.
नंदुरबार शहर पोलीस नागरिकांना आवाहन करीत आहेत की, ऑनलाइन खरेदी करताना पार्सल स्वीकारण्यापूर्वी शक्य असल्यास त्याची खात्री करून घ्यावी.
तसेच अत्यल्प किमतीत विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या महागड्या वस्तू खरेदी करण्यापूर्वी त्या वस्तू चोरीच्या, अपहार केलेल्या अथवा फसवणुकीतून मिळालेल्या नाहीत ना. याची खात्री करावी.
अशा प्रकारच्या संशयास्पद वस्तूंची खरेदी-विक्री टाळावी. कोणताही संशयास्पद व्यवहार अथवा माहिती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती द्यावी.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक अशिष कांबळे व उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक भुणेश मराठे, पोलीस हवालदार, जगदीश पाटील, प्रशांत पाटील तसेच पोलीस कॉन्स्टेबल आनंदा मराठे, राहुल राठोड, अनिल वसावे, रुपेश पगारे, राजेंद्र कटके, ललित गवळी, अमित भरवाड व निंबाबाई वाघमोडे, सर्व नंदुरबार शहर पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली असून, गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख करीत आहेत.
