मौलानांकडून जबरदस्तीने “जय श्री राम” घोषणा देण्यास भाग पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल…

मौलानांकडून जबरदस्तीने “जय श्री राम” घोषणा देण्यास भाग पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल…

पारोळा/जळगाव || दि. ११ जुन २०२६ || (प्रतिनिधी)-: परोळा तालुक्यातील चिनावल परिसरात एका मौलाना साहेबांना कथितरित्या जबरदस्तीने “जय श्री राम” घोषणा देण्यास भाग पाडल्याच्या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली असून या घटनेच्या निषेधार्थ समाजातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी पुढाकार घेत पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली. सुमारे पाच तास पोलीस ठाण्यात ठिय्या देत आणि सातत्याने पाठपुरावा करत अखेर संबंधित प्रकरणात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परोळा तालुक्यातील चिनावल भागात एका युवकाने एका मौलाना साहेबांवर कथितरित्या विशिष्ट धार्मिक घोषणा देण्यासाठी दबाव आणल्याची घटना घडली. या घटनेची माहिती समोर येताच समाजामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले. संबंधित घटनेमुळे सामाजिक सलोखा आणि धार्मिक सौहार्द बिघडू नये, यासाठी समाजातील जबाबदार नागरिक व संघटनांनी तत्काळ पुढाकार घेतला.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत समाजाच्या प्रतिनिधींनी पोलीस प्रशासनाची भेट घेऊन घटनेची सविस्तर माहिती दिली तसेच संबंधित दोषी व्यक्तीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली. निष्पक्ष तपास करून कायद्याच्या चौकटीत योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी प्रतिनिधींनी प्रशासनासमोर मांडली.

या वेळी जलगाव एकता संघटना तसेच कौमी एकता संघटना भडगावचे इमरान अली, एरंडोलचे असलम पिंजर, जुबेर भाई (परोळा), हाफिज अब्दुल रहीम, अनीस शाह, अन्वर भाई, अमीन भाई, आरिफ देशमुख. फारुख कादरी, बिट्टू सालार, शाहिद मेंबर, मुफ्ती हारुण, अमजद पठाण, यांच्यासह अनेक समाजसेवक व जबाबदार नागरिक उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने या घटनेचा निषेध व्यक्त करत प्रशासनाने कोणताही पक्षपात न करता निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.

दरम्यान, या घटनेप्रकरणी समोरील व्यक्तीविरुद्ध परोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे. यानंतर मौलाना साहेबांनी समाजातील सर्व नागरिकांना शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी विशेषतः तरुण वर्ग व संपूर्ण समाजबांधवांना विनंती करत सांगितले की, यापुढे कोणतीही प्रतिक्रिया न देता सर्वांनी कायद्याच्या चौकटीत राहून पुढील प्रक्रिया होऊ द्यावी. समाजामध्ये कुठेही तेढ निर्माण होणार नाही, सामाजिक सलोखा अबाधित राहील आणि बंधुभाव टिकून राहील, यासाठी सर्वांनी जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

उपस्थित प्रतिनिधींनीही भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रशासनाने वेळीच कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Call Us