दिवसाढवळ्या घरफोडी करणारे इंदूरचे सख्खे भाऊ; मुख्य आरोपी ताब्यात, ५.६९ लाखांचे सोने-चांदी जप्त

चाळीसगावरोड पोलिसांत गु.र.नं. २८८/२०२६; देवासमधील कारागिराकडून सोन्याची लगड, टोंगल व चांदीची लगड हस्तगत; फरार जावेदचा शोध सुरू

धुळे। काकर वाहिद
शिंदेनगर, धुळे येथील शिव वसंत अपार्टमेंट, राधेराधे अपार्टमेंट समोर राहणारे फिर्यादी श्री. प्रणय राजेंद्र खंडेलवाल यांच्या घरात ७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ ते ३.३० या दरम्यान अज्ञात चोरट्याने लॉकरमधील एकूण ४,१२,६०० रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी चाळीसगावरोड पोलीस ठाण्यात गु.र.नं. २८८/२०२६ अन्वये BNS कलम ३०५(अ), ३३१(३) नुसार दिवसा घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल होता.

सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांच्याकडून समांतर तपास सुरू असताना, पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर वारे, प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार करण्यात आलेल्या तांत्रिक विश्लेषणातून महत्त्वाची माहिती समोर आली. त्यानुसार (१) अकरम अब्दुल गफार अब्बासी, वय ४५, रा. ९८, श्रीनगर काकड, पो. एम.आय.जी. इंदूर (मध्यप्रदेश) व त्याचा सख्खा भाऊ (२) जावेद अब्दुल गफार अब्बासी, रा. मदीना नगर, आजादनगर, इंदूर (मध्यप्रदेश) यांनी दिवसा घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही आरोपी त्यांच्या घरीच असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथक इंदूरकडे रवाना करण्यात आले.

पथकाने इंदूर येथे जाऊन मुख्य आरोपी अकरम अब्दुल गफार अब्बासी यास ताब्यात घेतले. सखोल विचारपूस केली असता, त्याने आपला भाऊ जावेद अब्दुल गफार अब्बासी याच्यासोबत घरफोडी केल्याची कबुली दिली. जावेद हा बाहेरगावी गेल्याचे त्याने सांगितले. ताब्यातील आरोपी अकरम याच्याकडे चोरीच्या मुद्देमालाबाबत अधिक विचारपूस केली असता, त्याने चोरी केलेले सोने-चांदीचे दागिने दागिने बनविणारा कारागीर (३) शेख बासेद शेख सबुर, वय ५१, रा. ७७/१, रजपाली मार्ग, देवास, ता. नाहर दरवाजा (मध्यप्रदेश) यास विक्री केल्याचे सांगितले.

लागलीच पथकाने आरोपीसह देवास येथे जाऊन शेख बासेद शेख सबुर याच्याकडे विचारपूस केली असता, त्याने नमूद सोने-चांदीचे दागिने विकत घेतल्याचे सांगून सोने-चांदीच्या दागिन्यांची लगड व टोंगल काढून दिली. त्यानुसार हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल खालीलप्रमाणे :

मुद्देमालाचे वर्णन किंमत
१ ६.०६ ग्रॅम सोन्याचे टोंगल ७१,००० रु.
२ २५ ग्रॅम सोन्याची लगड वजा गोळी ३,३०,७५० रु.
३ १३०० ग्रॅम चांदीची लगड १,६७,७०० रु.
एकूण —५,६९,४५० रु.जप्त केले

अशा प्रकारे तांत्रिक विश्लेषणाद्वारे दिवसा घरफोडी करणारे दोन आरोपी निष्पन्न करून, मुख्य आरोपी तसेच चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या कारागिरासह एकूण ५,६९,४५० रुपये किमतीचे सोने-चांदीची लगड व सोन्याचे टोंगल ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे चाळीसगावरोड पोलीस ठाणे गु.र.नं. २८८/२०२६ BNS कलम ३०५(अ), ३३१(३) नुसारचा दिवसा घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. फरार आरोपी जावेद अब्दुल गफार अब्बासी याचा शोध सुरू आहे.

सदर कामगिरी पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी तसेच अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर वारे (प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे), सपोनि. दीपक ढोके, पोउनि. अमरजित मोरे, पोउनि. धनंजय मोरे आणि पोलीस अंमलदार प्रल्हाद वाघ, दिनेश परदेशी, देवेंद्र ठाकुर, महेंद्र सपकाळ, हर्षल चौधरी, अमोल पाटील, अमोल जाधव व सिद्धार्थ निकम यांनी केली आहे.

Call Us