धुळे महापौर मायादेवी परदेशी यांचे विषप्राशन; शहरात खळबळ, विघ्नहर्ता रुग्णालयात उपचार सुरू…..
सोशल मीडियावरील कथित आक्षेपार्ह पोस्ट आणि बदनामीकारक टीकेमुळे मानसिक तणाव आल्याचा आरोप; आमदार अनुप अग्रवाल यांची माहिती, संबंधित व्यक्तीविरोधात पोलिसांत गुन्हा
धुळे || दि. २२ नोव्हेंबर २०२६ || (प्रतिनिधी) धुळे शहराच्या राजकीय वर्तुळात रविवारी (दि. २२ नोव्हेंबर) मोठी खळबळ उडवणारी घटना घडली. धुळे महानगरपालिकेच्या महापौर मायादेवी परदेशी यांनी विषारी पदार्थाचे प्राशन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी धुळे येथील विघ्नहर्ता रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेची माहिती भाजपचे आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली. सोशल मीडियावर महापौर मायादेवी परदेशी यांच्याविषयी करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह पोस्ट आणि वैयक्तिक टीकेमुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याचा दावा आमदार अग्रवाल यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून धुळे शहरात सोशल मीडियावरील पोस्टवरून वाद निर्माण झाला होता. गोरक्षक संजय शर्मा यांनी महापौरांविषयी आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे शहरातील राजकीय वातावरण तापले असून महापौरांच्या सन्मानाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, महापौरांच्या विषप्राशनाच्या घटनेनंतर त्यांच्या समर्थकांमध्ये आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. महापौरांचे पती महादेव परदेशी यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय पथकाकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी संबंधित संजय शर्मा यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच पोलिसांनी त्यांना अटक केल्याचे वृत्तही समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
या घटनेच्या निषेधार्थ भाजपचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली धुळे शहरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नागरिक आणि महिलांनी सहभाग घेत सोशल मीडियावर महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. महापौरांच्या सन्मानाला धक्का पोहोचविणाऱ्या व्यक्तींविरोधात कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. या घटनेमुळे धुळे शहरात राजकीय आणि सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून महापौर मायादेवी परदेशी यांच्या प्रकृतीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
सोशल मीडियावरील वैयक्तिक टीका आणि बदनामीकारक पोस्टमुळे निर्माण होणारे सामाजिक व मानसिक परिणाम या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
