महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला २ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले…

महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला २ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले…

नंदुरबार || दि.२९ सप्टेंबर २०२६ || (फिरोज खान):- नवापूर : महावितरणच्या सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्याच्या अर्जाची प्रक्रिया करण्यासाठी २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे करण्यात आली.

नंदुरबार जिल्ह्यात लाचखोरीविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई सुरूच आहे. नवापूर तालुक्यात महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. सौर कृषी पंप योजनेतील कामासाठी ही लाच मागण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती.

तक्रारदाराने आपल्या शेतात सौर कृषी पंप मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज केला होता. यानंतर शेतातील बोअरवेल आणि लाभार्थ्याचे फोटो महावितरणच्या वेबसाइटवर अपलोड करण्याचे काम प्रलंबित होते. हे काम करून देण्यासाठी महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ राजेंद्र भामट्या वसावे, वय ४० वर्षे, यांनी तक्रारदाराकडे २ हजार ५०० रुपयांची लाच मागितल्याचे तक्रारीत नमूद आहे. तडजोडीनंतर २ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करण्यात आले.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २९ सप्टेंबर २०२६ रोजी खांडबारा, ता. नवापूर येथे सापळा रचला. यावेळी २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना राजेंद्र वसावे यांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी पोलीस ठाणे विसरवाडी, ता. नवापूर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नागरिकांकडून लाच मागितल्यास किंवा भ्रष्टाचारासंबंधी तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

Call Us