पोक्सो गुन्ह्यातील आरोपीला 20 वर्षांचा सश्रम कारावास; नंदुरबार न्यायालयाचा मोठा निर्णय…
नंदुरबार || दि. ०१ ऑक्टॉबर २०२६ || (फिरोज खान) :- नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे अल्पवयीन मुलीच्या अपहरण आणि लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला तब्बल 20 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच आरोपीला दंडाची शिक्षाही ठोठावण्यात आली आहे. नवापूर पोलीस ठाणे हद्दीतील तिनटेंबा गोसावीवाडा परिसरातील ही घटना आहे.
13 नोव्हेंबर 2025 रोजी 15 वर्षे 7 महिन्यांची अल्पवयीन मुलगी शाळेत गेली होती. मात्र, शाळेतून घरी परतल्यानंतर ती घरी न आल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. मुलगी परिसरात मिळून न आल्याने तिच्या पालकांनी नवापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी पीडित बालिकेचा शोध घेतला. चौकशीमध्ये आरोपी अजय ऊर्फ निखिल ताराचंद राठोड याने तिचे अपहरण करून तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली. यानंतर आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या प्रकरणाची सुनावणी मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, नंदुरबार येथे झाली. न्यायालयीन सुनावणीदरम्यान सरकार पक्षाच्या वतीने महत्त्वाचे साक्षीदार आणि पुरावे सादर करण्यात आले. पुराव्यांच्या आधारे आरोपी दोषी ठरल्याने न्यायालयाने त्याला 20 वर्षे सश्रम कारावास आणि 5 हजार रुपयांचा दंड, तसेच संबंधित अन्य कलमांनुसार अतिरिक्त कारावास व दंडाची शिक्षा सुनावली.
या सर्व शिक्षांनुसार आरोपीवर एकूण 20 वर्षांचा सश्रम कारावास आणि 13 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. विजय सी. चव्हाण यांनी काम पाहिले.
तपास अधिकारी, पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या तपासकार्याचे तसेच न्यायालयीन कामकाजाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक करण्यात आले.
अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे पोक्सो प्रकरणांमध्ये कठोर कायदेशीर कारवाईचा संदेश गेला आहे.
