देवपूरमधील घरफोडीचा गुन्हा उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई, आरोपी जेरबंद….
धुळे || दि.२६ नोव्हेंबर २०२५ ||(समीर शेख)-: देवपूर परिसरातील सुयोगनगर, वाडीभोकर रोड येथे घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने सराईत गुन्हेगाराला अटक केली असून त्याच्याकडून सुमारे १ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दि. 14 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 2.30 ते 5.30 वाजेदरम्यान फिर्यादी श्री. राधेश्याम सोनगीरे, रा. सुयोगनगर, वाडीभोकर रोड, देवपूर, प्लॉट नं. 13 येथील त्यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने सुमारे 4 लाख रुपये रोख रक्कम चोरून नेली होती. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात दि. 21 नोव्हेंबर 2025 रोजी गुन्हा रजिस्टर क्र. 379/2025, भारतीय न्याय संहिता कलम 331(4), 305(अ) अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनास्थळी अंगुलीमुद्रा तज्ञांकडून पंचनामा करण्यात आला होता. तांत्रिक तपास व मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे हा गुन्हा सराईत गुन्हेगार दत्तु अशोक ठाकरे (वय 35), रा. अनवर्द खुर्द, ता. चोपडा, जि. जळगाव याने केल्याचे निष्पन्न झाले.
स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीचा शोध घेत असताना दि. 23 नोव्हेंबर 2025 रोजी धुळे शहरातील रिया पेट्रोल पंपाच्या मागील पांझरा नदी किनाऱ्यावरून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपीने विश्वासात घेऊन केलेल्या चौकशीत घरफोडीची कबुली दिली व पुढील मुद्देमाल स्वतःहून काढून दिला : ₹ 1,87,000/- रोख रक्कम (500 रुपयांच्या 374 नोटा), ₹ 7,500/- किंमतीचा रिअलमी मोबाईल, एक प्लॅस्टिक कॅरीबॅग व बालाजी बॅग सेंटरचे व्हिजिटिंग कार्ड अशा प्रकारे आरोपीकडून एकूण ₹ 1,94,000/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
आरोपीविरुद्ध पूर्वीही गुन्हा दाखल आहे. दत्तु अशोक ठाकरे याच्यावर यापूर्वी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. 67/2023, भादंवि कलम 354, 354(अ) तसेच पोक्सो कायदा कलम 8 अंतर्गत गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे.
अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व पथकाची कामगिरी ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार (स्थानिक गुन्हे शाखा), अंगुलीमुद्रा तज्ञ सपोनि. विनोद खरात, पोउनि अमित माळी, धनंजय मोरे, संजय पाटील तसेच पोलीस अंमलदार मच्छिंद्र पाटील, हेमंत बोरसे, संतोष हिरे, योगेश चव्हाण, प्रल्हाद वाघ, ईश्वर सोनवणे व प्रकाश भावसार यांच्या पथकाने केली.
या यशस्वी कारवाईमुळे देवपूर परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
