लोहारा दुरक्षेत्र पोलिस चौकीची गंभीर दुरवस्था; परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेला धोका… तात्काळ दुरुस्तीची मागणी; सावदा पोलिस प्रशासनावर दुर्लक्ष केल्याचा आरोप…
रावेर/जळगाव ||दि.२२ डिसेंबर २०२५ || {हमीद तडवी}-: रावेर तालुक्यातील सावदा पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या सातपुडा पायथ्यावरील लोहारा दुरक्षेत्र पोलिस चौकीची अवस्था अत्यंत गंभीर झाल्याने परिसरातील नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. अनेक वर्षांपासून पडक्या अवस्थेत असलेली ही चौकी आता पूर्णपणे जीर्ण झाली असून भिंती आणि कौलारू छप्पर कोसळण्याची शक्यता वाढली आहे.
या परिसरातून लहान मुले, महिला व नागरिकांची सतत ये-जा सुरू असते. मात्र चौकीची धोकादायक अवस्था पाहता कधीही मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.चौकीच्या आतल्या खोल्यांमध्ये प्रचंड घाण साचली असून आरोग्याला बाधक परिस्थिती निर्माण झाली आहे. तुटलेल्या भिंती, पडलेले कौल, आणि परिसरात आढळणाऱ्या देशी दारूच्या बाटल्यांमुळे अवैध धंदे वाढल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ही परिस्थिती सावदा पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांच्या माहितीत असूनही दुर्लक्ष होत आहे. “तेरी भी चुप और मेरी भी चुप” असा आरोप करत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.या धोकादायक स्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून तात्काळ पोलिस चौकीची दुरुस्ती करून नागरिकांची जीवितहानी टाळावी, अशी रास्त मागणी लोहारासह परिसरातील जनतेने जिल्हा पोलिस प्रशासनाकडे केली आहे.
