उर्दू माध्यमाच्या शाळांना अद्याप पाठ्यपुस्तकांचा तुटवडा; तातडीने पुरवठ्याची AIMIM ची मागणी….
नंदुरबार || दि. २१ जुन २०२६ || (फिरोज खान) :- शैक्षणिक वर्ष २०२६-२७ सुरू होऊनही नंदुरबार जिल्ह्यातील अनेक उर्दू माध्यमाच्या शाळांना अद्याप आवश्यक पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यासंदर्भात नगर परिषद नंदुरबारच्या शिक्षण समिती सदस्य तथा AIMIM च्या नगरसेविका साजेदा बी मलक अशफाक यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.


सादर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र शासनामार्फत दरवर्षी शाळा सुरू होताच इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तसेच अध्यापन कार्य सुरळीत पार पडण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
मात्र, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतरही जिल्ह्यातील अनेक उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये आवश्यक पाठ्यपुस्तकांचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असून शिक्षकांनाही अध्यापन करताना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वेळेत पाठ्यपुस्तके उपलब्ध न झाल्यास अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
याबाबत साजेदा बी मलक अशफाक यांनी शिक्षण विभागाने वैयक्तिक लक्ष घालून जिल्ह्यातील सर्व उर्दू माध्यमाच्या शाळांना विद्यार्थी संख्येनुसार आवश्यक पाठ्यपुस्तके तात्काळ उपलब्ध करून द्यावीत, तसेच यासाठी योग्य नियोजन व प्रभावी कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे व त्वरित सकारात्मक पावले उचलावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
