रणधुमाळी सुरू होण्याआधीच महायुतीचा धडाका, जळगावमध्ये 12 जागांवर बिनविरोध विजय…

जळगाव || दि.०२ जानेवारी २०२६ || {विठ्ठल भालेराव} -: अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप–शिवसेना– राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीने जोरदार आगेकूच करत जळगाव महानगरपालिकेतील तब्बल 12 जागांवर बिनविरोध विजय मिळवत निवडणूक रणधुमाळी सुरू होण्याआधीच दणदणीत सुरुवात केली आहे. त्यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुकीत महायुतीने सुरुवातीलाच आपले वर्चस्व सिद्ध केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

जळगाव महापालिकेसाठी भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती निवडणुकीला सामोरे जात असून, अर्ज माघारीच्या प्रक्रियेत विरोधकांच्या माघारीमुळे अनेक प्रभागांत महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.प्रभाग क्रमांक 12-ब मधून भाजपच्या उज्वला बेंडाळे यांच्या विरोधातील अर्ज बाद झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

माघारीच्या दिवशी प्रभाग क्रमांक 18 मधून डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे यांच्या विरोधातील उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने ते बिनविरोध निवडून आले. तसेच प्रभाग क्रमांक 8 मधून शिवसेनेचे मनोज सुरेश चौधरी आणि प्रतिभा गजानन देशमुख हे दोघेही बिनविरोध विजयी झाले.

आज अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सकाळीच प्रभाग क्रमांक 2 मधून शिवसेनेचे सागर शाम सोनवणे बिनविरोध झाले. प्रभाग क्रमांक 7-अ मधून भाजपचे उमेदवार तथा आमदार राजूमामा भोळे यांचे सुपुत्र विशाल भोळे हे विरोधी उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने बिनविरोध निवडून आले. याच प्रभागातून भाजपच्या दीपमाला काळे यांचीही बिनविरोध निवड निश्चित झाली.

प्रभाग क्रमांक 16 मधून भाजपचे डॉ. विरन खडके यांच्या विरोधातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 13 मधून वैशाली अमित पाटील यांच्या विरोधातील उमेदवाराने शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतल्याने त्यांचीही बिनविरोध निवड निश्चित झाली.

प्रभाग क्रमांक 7-ब मधून अंकिता पंकज पाटील या देखील बिनविरोध निवडून आल्या.दरम्यान, अर्ज माघारीची मुदत अंतिम टप्प्यात असतानाच प्रभाग क्रमांक 19-अ मधून शिवसेनेचे विक्रम उर्फ गणेश सोनवणे यांच्या विरोधातील उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने त्यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.

अशा प्रकारे आज अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेचे 6 आणि भाजपचे 6 असे एकूण 12 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आता जळगाव महापालिकेतील उर्वरित 63 जागांसाठी प्रत्यक्ष निवडणूक होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

Call Us