मुलांच्या चेहऱ्यावर हास्य: आ. रघुवंशींकडून पावभाजी-आईस्क्रीमचे वितरण…..
नंदुरबार || दि. १० फेब्रुवारी २०२६ || ( फिरोज खान ) :- उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नंदुरबारमध्ये विद्यार्थ्यांसाठी आनंदाची मेजवानी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नंदुरबार शहरात शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंददायी उपक्रम राबविण्यात आला.
या निमित्ताने नंदुरबार येथील लोकमान्य टिळक विद्यालय, शाळा क्रमांक १० व ११ तसेच लोकमान्य विद्यालयातील विद्यार्थ्यांना पावभाजी व आईस्क्रीमचे वाटप करून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा मनापासून आनंद घेतला आणि शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

या कार्यक्रमात नंदुरबार नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. रत्ना चंद्रकांत रघुवंशी व महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत जी रघुवंशी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पावभाजी व आईस्क्रीमचे वितरण करण्यात आले.
मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व, शिस्त व आरोग्यदायी सवयींचे पालन करण्याचा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमास न. पा. उर्दू शाळा क्र. ११ च्या मुख्याध्यापिका शगुफ्ता खान, शिक्षक शेख जुल्मिनन, शेख खलील धोबी, नाजमीन पठाण तसेच शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते.

शाळा प्रशासनाने या उपक्रमाबद्दल मान्यवरांचे आभार मानले. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण करणारे व सामाजिक बांधिलकी जपणारे असे उपक्रम पुढेही सातत्याने राबविण्यात यावेत, अशी अपेक्षा शिक्षक व पालकांनी व्यक्त केली.
