सरकारी कामात अडथळा निर्माण करत हुज्जत घालणाऱ्या दोन्ही इसमांना मा. न्यायालयाने ठोठावला सश्रम कारावास व प्रत्येकी 6 हजारांचा दंड..!!
नंदुरबार दि.१६ जुलै २०२६ ( फिरोज खान ) :- फिर्यादी पोकॉ/१४०३ अनिल जिभाऊ बिऱ्हाडे यांचेसह पोहेकॉ/२६७ साहेबराव पुनाजी बहिरम व होमगार्ड शुभम संजय पाटील यांना नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे हद्दीतील कोरीट गावातील जिल्हा परिषद मराठी शाळा येथे दि. ०५/१०/२०२१ रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुक २०२१ बुथ बंदोबस्त दिलेला होता.
मतदान प्रक्रीया सुरु असतांना दुपारी ०३.४५ वाजता चे सुमारास दोन इसमांनी मतदान बुथवर प्रवेश करत मतदानाकरीता रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना शिवीगाळ करत म्हणु लागले की, “आमचे कोणीही वाकडे करु शकत नाही.” असे म्हणत जोरजोराने आरोळया मारत होते.
तेव्हा बुथ बंदोबस्तावरील फिर्यादी व इतर पोलीसांनी आरोळया मारणाऱ्या त्या दोन्ही इसमांना समजावून सांगितले की, येथे आरोळया मारु नका, गुपचूप मतदान करुन निघून जा. या गोष्टीचा राग येत सदर दोन्ही इसमांनी पोलीसांना अश्लील वाईट वाईट शिवीगाळ करण्यास सुरुवात केली होती.
दोन्ही इसम समजविण्याचे परिस्थिती नसल्याने त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी १) निलेश रमेश कोळी व २) गोपाल शांतीलाल कोळी रा. कोरीट ता.जि. नंदुरबार असे सांगत हया बापांचे कोणीही वाकडे कोणीही काही वाकडे करु शकत नाही. फिर्यादी व त्यांचे सोबतचे पोलीस अंमलदार हे बुथ सोडू शकत नसल्याने त्यांनी कोळदा सेक्टरचे पोलीस अधिकारी पोउपनि/माधुरी कंखरे यांना फोनव्दारे संपर्क साधत सदर घटनेची माहिती दिली होती. पोउपनि/माधुरी कंखरे हया त्यांचे स्टॉपसह कोरीट येथे मतदान बुथवर आले असता तेव्हा देखील १) निलेश रमेश कोळी व २) गोपाल शांतीलाल कोळी या दोघांनी पोउपनि/कंखरे यांना व त्यांचेसह असलेल्या पोलीस अंमलदारांना शिवीगाळ केली होती.
मतदान केंद्र परिसरात उपस्थित असलेल्या पोलीसांनी आ.क्र.१) निलेश रमेश कोळी व २) गोपाल शांतीलाल कोळी यांना त्यांचेवर कायदेशिर कारवाई करण्यात तंबी दिली असता याचा राग येत दोन्ही आरोपींनी फिर्यादी व मतदान केंद्र परिसरात उपस्थित पोलीसांवर हल्ला केला होता.
आरोपींनी फिर्यादीस हाताबुक्क्यांनी मारहाण केली त्यावेळी सेक्टर अधिकारी यांचे वाहनावरील पोलीस अंमलदारांनी व मतदानासाठी आलेल्या लोकांनी आरोपींच्या तावडीतून फिर्यादी पो.कॉ. अनिल बिऱ्हाडे यास सोडविले होते. सदर घटना फिर्यादी पोकों/ अनिल बिऱ्हाडे यांनी वरीष्ठांना कळविली होती.
त्याअन्वये आरोपी १) निलेश रमेश कोळी, वय-३२ व २) गोपाल शांतीलाल कोळी, वय-२३ दोन्ही रा. कोरीट ता. जि. नंदुरबार अशांविरुध्द नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे फिर्यादी पो.कॉ. अनिल बिऱ्हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गु.र.नं. ४९८/२०२१, भा.द.वि. कलम ३५३,३३२,३२३,५०४,५०६,५०९,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक श्री. कमलाकर चौधरी यांनी अत्यंत शास्त्रोक्त पध्द्तीने करत महत्वाचे पुरावे जमा केले होते व आरोपी १) निलेश रमेश कोळी व २) गोपाल शांतीलाल कोळी रा. कोरीट ता.जि. नंदुरबार अशांविरुध्द् मुदतीत दोषारोपपत्र मा. अति. सत्र न्यायालय, नंदुरबार येथे सादर केले होते.
सदर खटल्याची सुनावणी मा. अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार श्री. ए. एच. सय्यद यांचे समक्ष झाली. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाचे वतीने साक्षीदार तपासण्यात आले.
त्यात साक्षीदार, पंच व तपास अधिकारी यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या आहेत. यावरुन सबळ पुराव्याचे आधारे आरोपी नामे १) निलेश रमेश कोळी व २) गोपाल शांतीलाल कोळी रा. कोरीट ता. जि. नंदुरबार यांचेविरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने त्यांना मा. अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार श्री.ए. एच. सय्यद यांनी अति. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री. ए.एच. सय्यद यांचे कोर्टाने आ.क्र. १) निलेश रमेश कोळी २) गोपाल शांतिलाल कोळी दोन्ही रा. कोरीट ता.जि. नंदुरबार यांना भा.द.वि.क.-३५३,३३२,५०४,५०६ प्रमाणे तसेच लोकप्रतिनिधी कायदा कलम-१३२ अन्वये प्रत्येकी ६ महिने सश्रम कारावास रु. ६०००/- दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
सदर खटल्याचे कामकाज सरकारी पक्षाचे वतीने जिल्हा सरकारी वकील अॅड. विनोद गोसावी यांनी पाहिले असून मुख्य पैरवी अधिकारी म्हणून पोउपनि योगीता राठोड, पैरवी अंमलदार पो.हे.कॉ. नितीन साबळे, पो.हे.कॉ. शैलेंद्र प्रकाश जाधव, यांनी कामकाज पाहीले आहे.
तपास अधिकारी तसेच जिल्हा सरकारी वकील यांचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, यांनी अभिनंदन केले आहे.
