धुळ्यात एलसीबीच्या धडाकेबाज कारवाईने देशी दारू निर्मितीचा डाव फसला; १६३ किलो अफूचा चुरा जप्त…

१६३ किलो अफूच्या बोंडांची चुरा जप्त; देशी दारू निर्मितीचा डाव उधळला….

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई; तब्बल २९ लाख ४१ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

धुळे || दि. ११ सप्टेंबर २०२६ || (समीर शेख)-: मालमत्तेचे चोरीचे गुन्हे, अंमली पदार्थांची वाहतूक तसेच अवैध दारू साठ्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने धुळे पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई केली.

दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, गंभीर माणिक गावडे, रा. वय-५४, प्लॉट नं. ५८, के. संजयभाऊ नगर, मोहाडी उपनगर, ता. जि. धुळे यांच्या राहत्या घरात छापा टाकण्यात आला.

या ठिकाणी मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम करणारा अफू बोंडांचा चुरा (खसखस) तसेच भुगा/पावडर आणि बनावट देशी दारूचा साठा करून त्याची अवैध विक्री करण्याच्या उद्देशाने लपवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. पोलिसांनी घराची झडती घेतली असता १६३ किलो ८३ ग्रॅम अफू (खसखस) सुकलेल्या बोंडांचा चुरा जप्त केला. या मुद्देमालाची किंमत तब्बल २७ लाख ८५ हजार ११० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

याशिवाय बनावट देशी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे इलेक्ट्रिक बॉटलिंग मशीन, डोडा पावडर बनविण्याचे इलेक्ट्रिक ग्राइंडर मशीन, इलेक्ट्रिक वजनकाटा तसेच १८० मिलीच्या ९६ बाटल्या असा मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला.

कारवाईत एकूण २९ लाख ४१ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामध्ये १६३ किलो ८३ ग्रॅम अफू बोंडांचा चुरा, बनावट देशी दारूच्या बाटल्या, इलेक्ट्रिक बॉटलिंग मशीन, इलेक्ट्रिक ग्राइंडर मशीन आणि इलेक्ट्रिक वजनकाटा यांचा समावेश आहे.

या प्रकरणी मोहाडी उपनगर पोलिस ठाणे येथे आरोपी गंभीर माणिक गावडे याच्याविरुद्ध गु.र.नं. ३०८/२०२६, BNS कलम १२३ तसेच संबंधित अंमली पदार्थ अधिनियम १९८५ आणि महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. पथकात अधिकारी व अंमलदारांचा सहभाग होता.

Call Us