लोकशाही पत्रकार महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी किशोर दादा पवार यांची सर्वानुमते निवड…
जळगांव || दि.१८ ऑक्टॉबर २०२६ || (हमीद तडवी):- राष्ट्रीय निवड समिती आणि महाराष्ट्र प्रदेश कोअर कमिटीची संयुक्त मान्यता; पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा आणि राज्यभर मजबूत संघटन उभारण्याचा निर्धार लोकशाही पत्रकार महासंघ, भारताच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी किशोर दादा पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
महासंघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मान्यतेने राष्ट्रीय निवड समिती तसेच महाराष्ट्र प्रदेश कोअर कमिटीने त्यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब केले. या निवडीमुळे महाराष्ट्रातील पत्रकारांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे तसेच राज्यभर संघटनेचा विस्तार करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
या निवड प्रक्रियेत महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप जाधव, राष्ट्रीय कार्यकारिणीचे प्रमुख सदस्य तथा निवृत्त न्यायाधीश डॉ. संतोषकुमार जयस्वाल, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रतापराव साळुंखे, राष्ट्रीय महामंत्री टी. माधव, राष्ट्रीय संघटनमंत्री ज्ञानेश्वरजी बुधवंत, राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार ॲड. रमाकांत पाटील तसेच महाराष्ट्र प्रदेश कोअर कमिटीचे सदस्य डॉ. अनिलजी पाटील, सनम पाटील, हलीमा ताई शेख, पंचशीला कांबळे आणि रेणुकाताई जयस्वाल यांनी त्यांच्या निवडीला सर्वानुमते मान्यता दिली. किशोर दादा पवार गेल्या सहा ते सात वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. जनहिताचे प्रश्न, ग्रामीण भागातील समस्या, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तसेच शासन-प्रशासनाशी संबंधित विविध विषयांना त्यांनी सातत्याने वाचा फोडली आहे.
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनुभवाच्या बळावर त्यांनी विविध स्तरांवर संघटनात्मक कार्य केले असून, या अनुभवाचा उपयोग महासंघाच्या विस्तारासाठी केला जाणार आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यातील प्रत्येक विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावर महासंघाचे मजबूत संघटन उभारणे, पत्रकारांना एकत्र आणणे, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देणे, पत्रकारांच्या अडचणींचा पाठपुरावा करणे आणि आवश्यकतेनुसार कायदेशीर मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे, यावर त्यांचा विशेष भर राहणार आहे. तसेच पत्रकारांना लागू असलेल्या शासकीय योजना, विमा, आरोग्य सुविधा आणि इतर पात्रताधारित लाभांची माहिती तळागाळातील पत्रकारांपर्यंत पोहोचविण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधण्याचा त्यांचा मानस आहे.
“लोकशाही पत्रकार महासंघ हा पत्रकार आणि शासन-प्रशासन यांच्यातील प्रभावी दुवा म्हणून काम करेल. महाराष्ट्रातील पत्रकारांचे प्रश्न संघटितपणे मांडून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल. राज्यभर सक्षम संघटनात्मक जाळे उभारून प्रत्येक पत्रकाराला संघटनेच्या माध्यमातून आधार आणि योग्य मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू,” अशी भूमिका नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष किशोर दादा पवार यांनी व्यक्त केली. किशोर दादा पवार हे सेवा सोशल वेल्फेअर ग्लोबल फाउंडेशनचे संस्थापक- अध्यक्ष असून, संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, रोजगाराभिमुख प्रशिक्षण, स्वयंरोजगार आणि विविध सामाजिक उपक्रमांसाठी ते कार्यरत आहेत. पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि संघटनात्मक नेतृत्व या क्षेत्रांतील अनुभवाच्या आधारे पत्रकारांच्या प्रश्नांना प्रभावी व्यासपीठ मिळवून देण्याचा त्यांचा संकल्प आहे.
किशोर दादा पवार यांच्या निवडीमुळे लोकशाही पत्रकार महासंघाच्या महाराष्ट्रातील संघटनात्मक विस्ताराला नवी दिशा मिळेल आणि पत्रकारांच्या हक्कांसाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्यास बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
