जळगाव || दि. ०३जुलै २०२५ || (विठ्ठल भालेराव):-
जळगाव तालुक्यातील भादली गावातील दोन तरुणांना गुरुवारी सकाळी जळगाव शहरात येत असताना एका कारचालकाने जाणूनबुजून धडक दिल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत मोहम्मद इब्राहिम खाटीक (वय ३८, रा. भादली) या दुचाकीस्वार तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, त्याचा मित्र जावेद जाकिर पटेल (वय २९, रा. भादली) गंभीर जखमी झाला आहे.
सदर घटना सकाळी ११ वाजेच्या सुमारास असोदा रस्त्यावरील खारी डोह परिसरात घडली. मोहम्मद इब्राहिम खाटीक आणि जावेद पटेल हे दोघे दुचाकीने जळगावकडे येत असताना एका भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, कारचालकाने पहिल्यांदा दुचाकीला धडक दिली व नंतर गाडी रिव्हर्स घेऊन थेट इब्राहिमच्या अंगावर गाडी घातली. त्यामुळे इब्राहिमच्या छातीतून गाडी गेली आणि तो गंभीर जखमी झाला.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

इब्राहिम खाटीक याच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूनंतर रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला.
या गंभीर घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून कारचालकाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
