इकरा युनानी मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनींची विद्यापीठात सुवर्ण कामगिरी; दोन विद्यार्थिनींना गोल्ड मेडल…

इकरा युनानी मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनींची विद्यापीठात सुवर्ण कामगिरी; दोन विद्यार्थिनींना गोल्ड मेडल…

जळगाव || दि. ३१ जुलै २०२६ || (रियाज खान)-: इकरा युनानी मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनींनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS), नाशिक यांच्या बी.यू.एम.एस. परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विद्यापीठाच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीत महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींनी सुवर्ण यश मिळवत गोल्ड मेडलचा मान पटकावला.

शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील बी.यू.एम.एस. प्रथम वर्ष ते अंतिम वर्षाच्या निकालात काझी नूर फातेमा अजिमुद्दीन यांनी विद्यापीठात सर्वाधिक गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे त्यांना प्रतिष्ठेचे “Vice Chancellor Gold Medal” (कुलगुरू सुवर्णपदक) प्रदान करण्यात आले.

तसेच, शैक्षणिक वर्ष 2024 च्या हिवाळी सत्रातील प्रथम वर्ष बी.यू.एम.एस. परीक्षेत बुशरा अजिम खान यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व युनानी महाविद्यालयांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून आणखी एक मानाचा “Gold Medal” आपल्या नावे केला.

या दोन्ही गुणवंत विद्यार्थिनींचा संस्थेचे अध्यक्ष अब्दुल करीम सालार, सचिव एजाज मलिक आणि तारिक अन्वर शेख यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल देऊन गौरव करण्यात आला. यावेळी अध्यक्ष व सचिव यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अब्दुल कद्दूस आणि उपप्राचार्य डॉ. शोएब शेख यांनीही विद्यार्थिनींचे कौतुक करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी डॉ. इक्बाल शेख, डॉ. नसीम अन्सारी, डॉ. अजीम काझी, डॉ. एजाज शाह, डॉ. समीना खान, डॉ. सुमय्या शेख यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थिनींच्या यशाबद्दल अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

इकरा युनानी मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनींच्या या दुहेरी सुवर्ण यशामुळे महाविद्यालयासह जळगाव जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार आहे.

Call Us