नंदुरबार जिल्ह्यात १ ऑगस्ट रोजी सर्व शाळा,महाविद्यालये व अंगणवाड्यांना सुट्टी…

नंदुरबार जिल्ह्यात १ ऑगस्ट रोजी सर्व शाळा,महाविद्यालये व अंगणवाड्यांना सुट्टी…

नंदुरबार, दि. ३१ जुलै २०२६ (फिरोज खान): भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी नंदुरबार जिल्ह्यासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह जोरदार वाऱ्याचा रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा डॉ. मित्ताली सेठी यांनी शनिवार, दि. 1 ऑगस्ट 2026 रोजी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

राज्य आपत्ती नियंत्रण कक्ष, मुंबई येथून प्राप्त झालेल्या माहितीप्रमाणे, जिल्ह्यात 1 ऑगस्ट रोजीही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, त्यानंतरही पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

दरम्यान, हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर शुक्रवार रात्रीपासून जिल्ह्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असून, काही ठिकाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. संभाव्य पूरस्थिती, झाडे उन्मळून पडणे, वाहतुकीत अडथळे निर्माण होणे तसेच इतर आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, नगरपालिकां, नगरपरिषद व नगरपंचायतींकडून स्थानिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या आढाव्यात शहरी व ग्रामीण भागातील संभाव्य धोकादायक परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी हा आदेश जारी केला असून, जिल्ह्यातील सर्व शासकीय, अनुदानित व खासगी शिक्षण संस्थांनी या आदेशाची तात्काळ व काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभाग व जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, अनावश्यक प्रवास टाळावा, नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Call Us