हज व उमराह यात्रेकरूंचा इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशनतर्फे मुंबई विमानतळावर सत्कार..
मुंबई/नंदुरबार दि. १९ ऑगस्ट २०२६ || (फिरोज खान) -: इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थेतर्फे वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी उपक्रम राबविण्यात येतात. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून मुंबई विमानतळावर पवित्र हज व उमराह यात्रेसाठी मक्का-मदिना शरीफ येथे जाऊन सुखरूप परतलेल्या हाजी यात्रेकरूंचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मोहम्मद शेख गुलाब, रसीदा शेख, मोहम्मद रशीद शेख, साजिदा शेख, असलम शहा, आलम शहा, अफजल शहा, साजिद कुरेशी, सत्तार कुरेशी, हुसेन कुरेशी, सहेनाज बी, सलीमा बी, जुलेखा बी, सय्यद अयुब, शरीफ खान, रशीद खान, नजमा बी, मुमताज बी आदी हाजींचा समावेश होता.

यावेळी इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक तथा राज्य अध्यक्ष एजाज भाई बागवान यांनी सांगितले की, इस्लाम धर्माचे धर्मगुरू हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांनी मानवता, दया, प्रेम आणि शांततेचा संदेश दिला आहे. एकमेकांना मदत करणे तसेच सर्व धर्मांचा आदर व सन्मान करणे, ही त्यांची महत्त्वपूर्ण शिकवण आहे.
पवित्र मक्का-मदिना शरीफ येथे धार्मिक विधी, भक्ती व उपासना पूर्ण करून सुखरूप मायदेशी परतलेल्या सर्व हाजी यात्रेकरूंचा यावेळी एजाज भाई बागवान यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. हाजींना शाल, गुलाबपुष्प, पुष्पगुच्छ व मिठाई देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख, अशपाक शेख, आरिफ बागवान, साहिल शेख, आलम बागवान, रईस शेख, तौकीर बागवान आदी उपस्थित होते. फाउंडेशनच्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
