पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जयंतीनिमित्त इकरा युनानी कॉलेजमध्ये ‘एक पेड माँ के नाम’ अंतर्गत वृक्षारोपण…

पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जयंतीनिमित्त इकरा युनानी कॉलेजमध्ये ‘एक पेड माँ के नाम’ अंतर्गत वृक्षारोपण….

जळगाव || दि. 27 ऑगस्ट 2026 || (विठ्ठल भालेराव)-: पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जयंतीनिमित्त ‘मोहम्मद सल्ला सब के लिए’ अभियानांतर्गत ‘एक पेड माँ के नाम’ या पर्यावरणपूरक उपक्रमाच्या माध्यमातून इकरा युनानी कॉलेजच्या परिसरात गुरुवारी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अब्दुल कुद्दूस यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. यावेळी इकरा पब्लिक स्कूलचे प्राचार्य शकील शेख, इकरा शाहीन अकॅडमीचे उमर शेख तसेच इकरा युनानी कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. शोएब शेख यांच्या हस्तेही वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी प्राचार्य डॉ. अब्दुल कुद्दूस यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व सांगताना, ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत लावण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन हे मुलांप्रमाणेच प्रेमाने व जबाबदारीने करणे आवश्यक असल्याचे सांगितले. वृक्षांमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते, हवेची गुणवत्ता सुधारते, वन्यजीवांना संरक्षण मिळते तसेच विविध वनौषधींचा लाभ होतो. वृक्ष आपल्याला जीवनावश्यक ऑक्सिजन देतात आणि ऑक्सिजनचे महत्त्व संपूर्ण जगाला कोविड-19 महामारीच्या काळात प्रकर्षाने जाणवले, असेही त्यांनी नमूद केले.

या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. नसीम अन्सारी, डॉ. अजीम काझी, डॉ. सोमय्या सालार, डॉ. समीना खान, डॉ. मुजीब पिंजारी, डॉ. सबीला खान, डॉ. फातिमा तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांमध्ये वृक्षप्रेम आणि पर्यावरणाबाबतची सामाजिक जबाबदारी निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

Call Us