मदरसा उमर बिन खत्ताबचा वार्षिक जलसा उत्साहात संपन्न….
नंदुरबार || दि.७ ऑगस्ट २०२६ || (अशफाक शेख) :- नंदुरबार शहरातील पटेलवाडी परिसरातील मस्जिद-ए-उमर येथे मदरसा उमर बिन खत्ताबचा वार्षिक जलसा गुरुवारी, ६ ऑगस्ट रोजी मगरीबच्या नमाजनंतर उत्साहपूर्ण आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांचा उत्साह, पालकांची उपस्थिती आणि मान्यवरांचे मार्गदर्शन यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनाब खाटीक युनूस इब्राहिम होते.
वार्षिक जलशानिमित्त मदरशातील विद्यार्थ्यांनी वर्षभर घेतलेल्या धार्मिक शिक्षणातील प्रगतीचा गौरव करण्यात आला. विशेषतः कुरआन शरीफचे नाजेरा पठण पूर्ण (मुकम्मल) करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. मदरशाच्या वतीने या विद्यार्थ्यांना कुरआन शरीफची प्रत भेट देऊन त्यांच्या मेहनतीचे कौतुक करण्यात आले. तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक व धार्मिक वाटचालीसाठी मान्यवरांनी शुभेच्छा देत त्यांची होसला अफजाई केली.
यावेळी मदरशाच्या वतीने वर्षभर घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही विशेष गौरव करण्यात आला. शेख युसूफ सर, मौलाना इकबाल आणि पठाण अजीम सर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी धार्मिक शिक्षणाचे महत्त्व, कुरआन पठण आणि संस्कार याबाबत विविध उपक्रम सादर केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या सादरीकरणाला उपस्थित पालक व नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि गुणवत्तेचे कौतुक करत धार्मिक शिक्षणासोबतच चांगले संस्कार, शिस्त आणि शिक्षणाला महत्त्व देण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी करावा, असेही मार्गदर्शन करण्यात आले.
मदरसा उमर बिन खत्ताबच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा वार्षिक जलसा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा, त्यांच्या आत्मविश्वासात वाढ करणारा तसेच शैक्षणिक आणि धार्मिक प्रगतीला चालना देणारा ठरला.
कार्यक्रमास परिसरातील विद्यार्थी, पालक, नागरिक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मौलवी जावेद, मुफ्ती शाहरुख, हाफिज साजिद तसेच तरुण वर्गाने विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुफ्ती शाहरुख यांनी केले, तर मुतवल्ली शेख युसूफ यांनी उपस्थितांचे आभार मानले.
