१२ व्या दिवसाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरात विशेष वाहतूक नियोजन….

१२ व्या दिवसाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरात विशेष वाहतूक नियोजन….

नंदुरबार || दि.२१ सप्टेंबर २०२६ || (फिरोज खान) :- शहरातील मानाचे बाबा गणपती, दादा गणपती, माळीवाड्याचा राजा गणपती मित्र मंडळ, श्रीराम सेनेचा राजा गणपती मित्र मंडळ यांच्यासह शहरातील एकूण ४३ खासगी व सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तीची १२व्या दिवशी विसर्जन मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे.

—सदर विसर्जन मिरवणुकीचा प्रमुख मार्ग फुले पुतळा भद्रा चौक चिराग अली मशीद इलाही चौक फडके चौक – जळका बाजार – छत्रपती शिवाजी महाराज चौक – दोशहा तकिया – दादा गणपती – देसाईपुरा-मोठा मारुती असा निश्चित करण्यात आला आहे. तसेच काही गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक काकाचा ढाबा -गांधी पुतळा – नेहरू पुतळा – नगरपालिका चौक या मार्गाने मार्गस्थ होणार आहे.

विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहावी तसेच मिरवणूक मार्गावर कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये, यासाठी नंदुरबार शहर वाहतूक शाखेकडून विशेष वाहतूक नियोजन करण्यात आले आहे.

या नियोजनांतर्गत नवापूर चौफुली, फुले पुतळा, सातपीर गल्ली, जळका बाजार, छत्रपती शिवाजी महाराज चौक, दोशहा तकिया, दादा गणपती, देसाईपुरा-मोठा मारुती, अंधारे चौक, नेहरू पुतळा, गांधी पुतळा आणि महाराष्ट्र व्यायामशाळा या महत्त्वाच्या ठिकाणी तात्पुरते बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. मिरवणूक व नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व अंमलदार आवश्यक त्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.

नागरिक व वाहनधारकांनी विसर्जन मिरवणुकीच्या कालावधीत शक्यतो मिरवणूक मार्गाचा वापर टाळून पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. मिरवणूक मार्गावर वाहने उभी करू नयेत तसेच वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना व मार्गदर्शनाचे काटेकोरपणे पालन करावे.

गणपती विसर्जन मिरवणूक शांततेत, सुरक्षितपणे व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि वाहनधारकांनी नंदुरबार शहर वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन नंदुरबार शहर वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

Call Us