महाराष्ट्र बॉर्डरवरील वजन काट्यात गडबड? ४०० किलोचा फरक आल्याने वाहनधारकाचा संताप; ऑडिओ क्लिप व्हायरल….
नंदुरबार || दि ०२ ऑक्टॉबर २०२६ || (फिरोज खान) :-महाराष्ट्र बॉर्डरवर वाहनांचे वजन करणाऱ्या काट्यावर भोंगळ कारभार आणि त्रुटी असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एकाच गाडीचे अवघ्या काही वेळात आणि मागे-पुढे केल्यावर वजन तब्बल ४०० किलोने कमी-जास्त भरल्याचा गंभीर आरोप वाहनधारकाने केला आहे.
या संपूर्ण प्रकाराची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
संबंधित ऑडिओ क्लिपमध्ये उत्तर महाराष्ट्र माल मोटर असोसिएशन (धुळे) चे कार्यकर्ते आणि वजन काट्यावरील कर्मचारी भूषण पाटील यांच्यात झालेला थेट संवाद ऐकायला मिळत आहे.
गाडी क्रमांक MH 05 FJ 3460 या कापूस भरलेल्या वाहनाचे सुरुवातीला वजन १८ टन ९५० किलो भरले होते. मात्र, गाडी थोडी मागे-पुढे करून पुन्हा वजन केले असता ते थेट १८ टन ५४० किलो म्हणजेच तब्बल ४०० ते ४५० किलोने कमी दाखवण्यात आले.
“४०० किलोचा हा फरक नेमका कसा काय आला? ही कोणती जादू आहे?” असा सवाल करत वाहनधारकाने काट्याच्या अचूकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ५० ते १०० किलोचा फरक समजू शकतो, पण ४०० किलोच्या फरकामुळे नसलेला ओव्हरलोड दाखवून हजारो रुपयांचा दंड आकारला जातो. यामुळे गोरगरीब ड्रायव्हर आणि वाहन मालकांची मोठी लूट होत असल्याचा आरोप वाहनधारकाने केला आहे.
या प्रकरणी कर्मचाऱ्याने गाडी काट्यावर योग्य पद्धतीने उभी नसल्याने वजनात फरक पडल्याचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहनधारकाने ही सर्व कॉल रेकॉर्डिंग वरिष्ठ अधिकारी राघवन साहेब आणि संबंधित वाहतूक संस्थांच्या ग्रुपवर पाठवून तक्रार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. बॉर्डरवरील वजन काट्यांमध्ये खरोखरच तांत्रिक बिघाड आहे की जाणीवपूर्वक हा प्रकार घडवला जात आहे,
याची सखोल चौकशी आरटीओ (RTO) प्रशासनाने करावी, अशी जोरदार मागणी आता वाहनधारकांकडून केली जात आहे.
