सैय्यद फरहत हुसैन यांची पुनश्च एमआयएम नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी निवड….

सैय्यद फरहत हुसैन यांची पुनश्च एमआयएम नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी निवड….

नंदुरबार || दि. १६ सप्टेंबर २०२६ || (फिरोज खान) :- ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM)च्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी सैय्यद फरहत हुसैन यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. या संदर्भातील अधिकृत माहिती एमआयएम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून दिली आहे.

सैय्यद फरहत हुसैन यांची जिल्हाध्यक्षपदी पुनर्निवड झाल्याबद्दल इम्तियाज जलील यांनी त्यांचे अभिनंदन करत, नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

पुनर्निवडीची माहिती समोर येताच नंदुरबार जिल्ह्यातील एमआयएमचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत करत, त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक मजबूत आणि सक्रिय होण्याची अपेक्षा व्यक्त केली.

आगामी काळात पक्ष संघटना बूथ स्तरापर्यंत मजबूत करणे, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणे तसेच गरजू नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे, यावर भर दिला जाणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

आपल्या पुनर्निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना सैय्यद फरहत हुसैन यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले. “पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि सोपवलेली जबाबदारी पूर्ण निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडीन,” असे सांगत त्यांनी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.

दरम्यान, सैय्यद फरहत हुसैन यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणुकीत एमआयएमने ६ पैकी ४ जागांवर विजय मिळवला होता, असा उल्लेख पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. त्यांच्या पुनर्निवडीमुळे नंदुरबार जिल्ह्यात पक्ष संघटनेच्या आगामी वाटचालीकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Call Us